जय माता दी...
नवरात्र उत्सवाची परंपरा कायम
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर : संकटाच्या काळात माणसाला धैर्य, मानसिक बळ आणि आशेची
नितांत गरज असते. भारतीय संतपरंपरेने नेहमीच अध्यात्म, साधना आणि ईश्वरभक्तीच्या माध्यमातून समाजाला संकटांचा सामना करण्याची प्रेरणा दिली आहे. याच श्रद्धा आणि भक्तीच्या परंपरेतून मिटमिटा येथील स्वामी श्री मच्छिंद्रनाथ मंदिर व योग उपासना अध्यात्म केंद्रात त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता मंदिर साकारले आहे.
परमपूज्य सदुरू योगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या दुर्गा सप्तशती पारायण उपक्रमाने भक्ती, सामूहिक साधना आणि देवी उपासनेचे एक वैशिष्ट्यपूर्ण पर्व निर्माण केले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग भयभीत झाले होते. अशा कठीण परिस्थितीत मनाला स्थैर्य मिळावे, संकटाचा धैर्याने सामना करण्याची शक्ती प्राप्त व्हावी आणि भक्तांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, या भावनेतून सद्गुरू डॉ. मंगलनाथ महाराज यांनी दुर्गा सप्तशतीचे पारायण करण्याचा आदेश दिला. जगदंबेची उपासना करण्याचे आवाहन करत त्यांनी
एका वर्षात दुर्गा सप्तशतीचे १०० पाठ करण्याचा संकल्प भक्तांसमोर ठेवला. प.पू. सगुरु योगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज चित्रकुट करवी प्राचीन नाथ गादीचे पिठाधीश यांनी भारतातील पहिले स्वामी मच्छिंद्रनाथ महाराज मंदिर व योग उपासना अध्यात्म केंद्र छत्रपती संभाजीनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मिटमिटा येथे १९९३ साली स्थापन केले. येथे वर्षभर ओंकार, सोहम, ध्यान साधना शिकविल्या जाते. या मंदिरात साधना कक्ष, पहिले ध्यान मंदिर, निवासी कक्ष, गोशाळा, समाधी मंदिर आहे. याच मंदिरात त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता मंदिर असून त्याला इतिहास आहे.
जनकल्याणासाठी केले पाठ
कोरोनाची पावले त्रिकालज्ञानी परम पूज्य सद्गुरु योगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज यांनी आधीच ओळखली होती. जग जेंव्हा संकटात सापडत त्यावेळी संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी, संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी संत सत्पुरुष मार्ग दाखवत असतात. त्यांना काळ, काळाची गती आणि भविष्यातील घटना यांचे समग्र ज्ञान असते. त्यांनी सप्तशतीचे पाठ करा असे आदेश दिलेत. जगदंबेची उपासना करायला सांगितली. श्री दुर्गा सप्तशती पाठ केल्याने, ऐकल्याने, पठणाने दृष्टवृत्तींचा नाश होतो, देवीची कृपा आणि देवीचे सानिध्य लाभते. ऐश्वर्य, धन, वैभव मिळते. सर्व ब्रम्हांडाची स्वामिनी जगजननी आदिमाया आहे. जे सप्तशतीचे पारायण, पाठ करतात त्यांना सर्व सुखे मिळतात. त्यामुळे त्रिकालज्ञानी श्री मंगलनाथ महाराजांनी कोरोनाचे संकट ओळखून सर्वांना दुर्गा सप्तशतीचे १०० पाठ एका वर्षात करण्याचे आदेश दिलेत. पाठ सुरू करण्याचा दिवस होता १९ एप्रिल २०२०. या देवी उपासनेत तीन हजार हून अधिक शिष्य व देवीभक्त सहभागी झालेत. भाव, भक्ती, देवी प्रति संपूर्ण श्रद्धा, शुचिर्भूततेने मनोभावे पाठ करत तीन लक्ष चौरयंशी हजार पाठ एका वर्षात करण्यात आले.














